दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार? 'चैत्यभूमी' नामकरणासाठी सरकारची मोठी तयारी! मनसेचा विरोध
मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असलेल्या दादर स्थानकाचे नाव बदलून 'चैत्यभूमी' करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला यापूर्वीच तत्त्वतः मंजुरी दिली असून, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक ती कायदेशीर आणि समितीस्तरीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, सरकारच्या या हालचालींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) कडाडून विरोध दर्शवला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दादर स्थानकाच्या नामांतराबाबत स्पष्ट भूमिका मांडली. दादर स्थानकाला 'चैत्यभूमी' हे नाव देण्याबाबत राज्य शासनाने केंद्राकडे पत्रव्यवहार केला असून, केंद्राकडून विधिमंडळ समितीशी संबंधित प्रक्रियेबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. आगामी अधिवेशनात या सर्व औपचारिकता पूर्ण करून नामकरणाचा निर्णय प्रत्यक्षात आणला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मनसेचा विरोध आणि भूमिका
दुसरीकडे, या निर्णयाचे वृत्त समोर येताच मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "दादरकरांच्या भावना लक्षात न घेता किंवा त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेणे योग्य नाही. बाहेरील कोणाचीही मागणी स्थानिक नागरिकांवर लादू नये," अशा शब्दांत किल्लेदार यांनी सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. यापूर्वीही जेव्हा हा विषय चर्चेत आला होता, तेव्हा स्थानिकांनी याला विरोध दर्शवला होता. हा विषय रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने, दादरकरांचा विरोध पत्राद्वारे थेट पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवला जाईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.

