अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा', मुंबई विमानतळ आणि महालक्ष्मी रेसकोर्सला बॉम्बच्या धमक्या
अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'जलसा' बंगल्याला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. या ईमेलमध्ये मुंबई विमानतळ, महापौर कार्यालय आणि महालक्ष्मी रेसकोर्स यांचाही उल्लेख असून, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील 'जलसा' बंगल्याला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. मुंबई प्रशासनाला मिळालेल्या एका नव्या धमकीच्या ईमेलमध्ये 'जलसा' तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा उल्लेख आहे. हा धमकीचा ईमेल समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, ईमेलमध्ये उल्लेख असलेल्या सर्व ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. तसेच महापौर कार्यालय आणि विमानतळासह अनेक प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.
वृत्तानुसार, अधिकाऱ्यांना मिळालेल्या ईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांचा बंगला, मुंबई महापौरांचे कार्यालय, महानगरपालिका, एक बँक, एक न्यायालय, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा उल्लेख आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, बॉम्ब शोधक पथके आणि सुरक्षा कर्मचारी या सर्व ठिकाणांची कसून तपासणी करत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शोधादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्बसारखे साहित्य सापडले नाही. सध्या, पोलीस सायबर टीमच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचे आणि धमकीच्या सत्यतेची चौकशी करण्याचे काम करत आहे.

