मार्गशीर्ष २०२६: महालक्ष्मी गुरुवार व्रताच्या तारखा, महत्त्व आणि पूजाविधी
हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र आणि व्रतवैकल्यांसाठी विशेष मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात दर गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची परंपरा असून, हे व्रत केल्याने उत्तम फळ प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा हा महिना नेमका कधी सुरू होणार आहे आणि या काळात किती गुरुवार येणार आहेत, याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आणि गुरुवारच्या तारखामराठी पंचांगानुसार, यंदा मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ बुधवार, ९ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे या महिन्यातील पहिला गुरुवार दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० डिसेंबर रोजी येत आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यात एकूण पाच गुरुवार असतील:
पहिला गुरुवार: १० डिसेंबर २०२६
दुसरा गुरुवार: १७ डिसेंबर २०२६
तिसरा गुरुवार: २४ डिसेंबर २०२६
चौथा गुरुवार: ३१ डिसेंबर २०२६
पाचवा गुरुवार: ७ जानेवारी २०२७
महालक्ष्मी व्रताचे महत्त्व
धार्मिक शास्त्रानुसार, देवी महालक्ष्मी ही धन, धान्य, ऐश्वर्य, सौभाग्य आणि सुख-समृद्धीची देवता मानली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवीची आराधना केल्यास घरात सुख, शांती आणि भरभराट नांदते. सुखी संसाराची कामना पूर्ण होण्यासाठी तसेच मनातील इच्छांच्या पूर्ततेसाठी सुवासिनी महिला आणि कुमारिका हे व्रत करतात. भाविक आपल्या क्षमतेनुसार एकभुक्त राहून किंवा फलाहार व पाणी घेऊन हा उपवास करतात.
पूजाविधी आणि उद्यापन
व्रताच्या दिवशी महिला पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करतात. देवघरात किंवा घरातील पवित्र ठिकाणी चौरंग मांडून त्यावर महालक्ष्मीची पूजा मांडली जाते. ही पूजा सायंकाळी करण्याची पद्धत आहे. या पूजेमध्ये पाण्याने भरलेल्या कलशावर नारळ ठेवून त्याला अलंकार व वस्त्रांनी सजवून देवी महालक्ष्मीचे रूप दिले जाते.
पूजा मांडल्यानंतर विधिवत पूजा करून 'महालक्ष्मी व्रताची कहाणी' वाचली जाते. शेवटी देवीची आरती करून नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद वाटला जातो. दर गुरुवारी अशा प्रकारे पूजा केल्यानंतर, मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन केले जाते.

