शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्री स्वामी समर्थ
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025 (05:17 IST)

स्वामी समर्थांचे शेवटचे शब्द कोणते होते?

स्वामी समर्थांचे शेवटचे शब्द कोणते होते?
स्वामी महाराजांनी आपल्या पुढील कार्याचे नियोजन पूर्वीच निश्चित केले होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत एक दिव्य संकल्प दडलेला होता. स्वामी आपल्या भक्तांना आपल्या जीवनातील आणि लीलांतील अनेक गोष्टी सांगत असत. श्री चोळप्पा यांचे निर्वाण झाल्यानंतर स्वामी महाराजांनी आपल्या पुढील कार्याचा आराखडा ठरवण्यास सुरुवात केली होती.
 
काळ जसजसा पुढे सरकत होता, स्वामींना अधूनमधून ताप येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या आहारात आणि शरीरात काहीसा फरक जाणवू लागला. तरीसुद्धा त्यांच्या बोलण्यात आणि अंगभूत तेजात काहीही कमी नव्हती. भक्त त्यांना विश्रांती घेण्याची विनंती करत, पण स्वामींचा स्वभाव अगदी निर्धाराचा —
“आम्हाला आराम नको!” असं ते ठामपणे सांगत.
 
एकदा काही भक्तांनी त्यांच्यासाठी बिछान्याची तयारी केली, तेव्हा स्वामी म्हणाले,
“आम्हाला आराम करायचा नाही, आमचं कार्य अजून संपलेलं नाही.”
 
सोलापूरहून काही वैद्य त्यांची नाडी तपासण्यासाठी आले होते. पण स्वामींनी क्रोधाने त्यांना दूर पाठवले आणि म्हणाले,
“जा, आम्हाला तुमची गरज नाही.”
 
हे पाहून सर्व भक्त आश्चर्यचकित झाले, कारण स्वामींमध्ये अद्यापही अपार तेज आणि सामर्थ्य जाणवत होते.
 
स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीसही अनेक प्रमुख व्यक्तींमार्फत चांगली कार्ये करून घेतली. त्यांनी समाजहितासाठी दानधर्म घडवून आणला. अखेर १८७८ साली चैत्र महिन्याच्या शुद्ध त्रयोदशीचा तो दिवस उजाडला. कुणालाही वाटले नव्हते की आज काही विलक्षण घडेल. त्या दिवशी स्वामींनी आपल्या सेवकांना सांगितले —
“सर्व जनावरे माझ्या दर्शनासाठी आणा.”
 
सर्वांनी गायी, बैल, वासरे आणली. स्वामींनी प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, त्यांना अन्न घातले, आणि आपल्या वस्त्रांचे तुकडे त्या मुक्या प्राण्यांना घातले. त्या प्राण्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले जणू त्यांना काहीतरी जाणवले होते.
 
यानंतर स्वामी महाराज आपल्या पलंगावर शांतपणे बसले. सेवकाने त्यांच्या पाठीशी लोड ठेवले. क्षणभरात स्वामींनी डोळे मिटले. वैद्याने नाडी तपासली, पण नाडी सापडली नाही...क्षणात संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. भक्तांची मने हलली.
 
पण काही वेळाने स्वामींनी एक विलक्षण लीला दाखवली — त्यांनी पुन्हा डोळे उघडले आणि सर्वांना एक मंत्र दिला — “जो मनापासून माझी भक्ती करेल, त्याच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन.” हे शब्द उच्चारून त्यांनी पुन्हा डोळे मिटले... आणि या वेळी कायमचे.
 
सर्व भक्तांना एकच आशा होती —
“स्वामी पुन्हा डोळे उघडतील...” पण स्वामींनी आपल्या भक्तांच्या अंतःकरणातच कायमचं स्थान घेतलं.
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ.
 
अस्वीकारण: वरील माहिती धार्मिक, पोथी व श्रद्धेच्या आधारावर सादर केली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. श्रद्धा व भक्ती या वैयक्तिक भावना असून या लेखाचा उद्देश फक्त भावनिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रेरणा देणे हा आहे. वेबदुनिया या माहितीच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.