ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर बस पुलावरून कोसळली, आठ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
आज सकाळी उत्तराखंडमध्ये एक भीषण बस अपघात घडला. मंगळवारी सकाळी गुलारजवळ हरिद्वारहून कर्णप्रयागला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. ही बस पुलाखाली सुमारे १०० मीटर खोल ओढ्यात कोसळली. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीचा ऋषिकेश एम्समध्ये दाखल केल्यावर मृत्यू झाला.
गुलार बाजारजवळ झालेल्या अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ जण होते. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सेवेची बस हरिद्वारहून पहाटे ३:३० वाजता निघाली होती. ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर बस अपघात झाल्याची माहिती मिळताच, एसडीआरएफच्या ब्यासी आणि ढालवाला चौक्यांवरील पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मदत व बचाव कार्याला सुरुवात केली.
चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, इतर दोघे खड्ड्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत बसमधून २० जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी १९ जणांना तातडीच्या उपचारांसाठी एम्स ऋषिकेश येथे पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींना ऋषिकेश येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसडीआरएफची अतिरिक्त पथकेही घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. घटनास्थळी पोलीस दल उपस्थित आहे. एसडीआरएफ आणि पोलीस पथके समन्वय साधून मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. बचाव कार्य सुरू आहे.
