मुंबई विमानतळावर मानवी तस्करीचा पर्दाफाश; ट्रॅव्हल एजंट महिलेला नेदरलँड्सला पाठवत होता
मुंबई विमानतळावर बनावट विवाह प्रमाणपत्र वापरून एका महिलेला नेदरलँड्सला पाठवण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. ४३ वर्षीय ट्रॅव्हल एजंटला अटक करण्यात आली, त्याला मानवी तस्करी रॅकेट चालवल्याचा संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या दक्षतेने मानवी तस्करीचा एक गुन्हा उघडकीस आला. बनावट विवाह प्रमाणपत्र वापरून २८ वर्षीय महिलेला नेदरलँड्सला नेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी उधळून लावला. मुख्य आरोपी विजय कुमार राधेश्याम ग्रोव्हर याला ताब्यात घेण्यात आले.
ही घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. दिल्लीमध्ये ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणारा आणि पंजाबमधील जालंधरचा रहिवासी असलेला विजय कुमार ग्रोव्हर महिलेसोबत विमानतळावर पोहोचला आणि त्याने दावा केला की ते विवाहित आहे आणि अॅमस्टरडॅमला प्रवास करत आहेत. त्याने डिसेंबर २०२३ रोजीचे लग्न प्रमाणपत्र सादर केले, जे कथितपणे गाजियाबादमध्ये जारी केले गेले होते. कागदपत्रे तपासल्यानंतर अधिकाऱ्यांना विरोधाभास आढळले आणि प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले.
विदेशात जाण्यासाठी आरोपीने तिच्याकडून २५ लाख रुपये घेतल्याचे चौकशीत महिलेने सांगितले. तपासात असेही उघड झाले की आरोपीने तो विवाहित नसल्याचे कबूल केले आणि पोलिसांना असा संशय आहे की त्याने ३०-३५ महिलांसाठी बनावट पासपोर्ट आणि व्हिसा मिळवले आहे.
मुंबई गुन्हे शाखेचा प्रॉपर्टी सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी आरोपीचा जोडीदार गुरजीत सिंग याचा शोध सुरू केला आहे, जो महिलेला आरोपीशी जोडणारा मध्यस्थ होता. आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik