दिल्ली इमारत दुर्घटने प्रकरणी मोठी कारवाई, एमसीडीचे ५ अधिकारी निलंबित
दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) दक्षिण कॅम्पसजवळील ३० वर्षे जुनी पाच मजली सत्य निकेतन इमारत रविवारी कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. दुर्घटनेचे अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहेत. या घटनेवर कारवाई करत दिल्ली सरकारने एमसीडीचे उपायुक्त, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना निलंबित केले आहे.......
दिल्लीत कोसळलेल्या इमारतीचे मालक हरिराम बन्सल आहेत. मालक हरिराम यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी १० वेगवेगळी पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये स्थानिक जिल्हा पोलीस, विशेष पथके आणि इतर ऑपरेशनल युनिट्सच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
प्रत्येक पथकाचे नेतृत्व अतिरिक्त डीसीपी दर्जाचे अधिकारी करत आहेत. हरिराम यांना पकडण्यासाठी पोलीस दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये छापे टाकत आहेत.दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी सत्य निकेतन इमारत कोसळण्याच्या घटनेसंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ताही उपस्थित राहणार आहेत. डीडीए, एमसीडी आणि दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Edited By - Priya Dixit