1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. Karlovic and Anderson enter the finals

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरीत कार्लोविच आणि अँडरसनचा अंतिम फेरीत प्रवेश

Karlovic
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरी गटात क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने स्टीव्ह दार्सिसचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 4-6,  6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने बेलारूसच्या स्टीव्ह दार्सिस याचा 7-6(3), 4-6, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 1तास 55मिनिटे झालेल्या संघर्षपूर्ण लढतीत पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला जोरदार खेळ केला व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये कार्लोविचने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर 5-2अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर दार्सिसने 8व्या गेममध्ये केलेल्या डबल फॉल्टचा फायदा घेत कार्लोविचने त्याची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-6(7-3)असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दार्सिसने वरचढ खेळ करत हा सेट कार्लोविच विरुद्ध 6-4असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये 2-1अशा स्थितीत सामना असताना कार्लोविचने दार्सिसची सर्व्हिस ब्रेक केली व या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत हा सेट 6-3असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. काल उशिरा संपलेल्या सामन्यात मागच्या वर्षीचा उपविजेता केविन अँडरसन (दक्षिण आफ्रिका) ने गतविजेता गिल्स सिमोन (फ्रान्स) ला ६-३, ७-६ सरळ सेट्स मध्ये हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. मागच्या वर्षी अंतिम सामन्यात सिमोन ने अँडरसन ला पराभूत करून टाटा ओपन महाराष्ट्राचा खिताब पटकावला होता
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: उपांत्य फेरी:
इवो कार्लोविच(क्रोएशिया)वि.वि. स्टीव्ह दार्सिस(बेलारूस) 7-6(3), 4-6, 6-3.
केविन अँडरसन(दक्षिण आफ्रिका) वि.वि. गिल्स सिमोन (फ्रान्स) ६-३, ७-६ 

अभिजित देशमुख
पुढील लेख
कोणी मराठी का नाही बनू शकत पंतप्रधान? नक्कीच बनेल - फडणवीस