राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! न्यायाधीश आणि वकिलांना सुरक्षित स्थळी हलवले
महाराष्ट्रातील सात सत्र न्यायालयांना सोमवारी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. यानंतर, सर्व न्यायालये रिकामी करण्यात आली आणि पोलीस व बॉम्ब शोधक पथकांनी शोधमोहीम सुरू केली.
महाराष्ट्रातील सात सत्र न्यायालयांना बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ उडाली. सातारा, सोलापूर, ठाणे, बीड, रत्नागिरी, परभणी आणि हिंगोली येथील न्यायालयांना लक्ष्य करण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस, श्वान पथके आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळी दाखल झाली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आणि न्यायालयाच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या. सर्वत्र तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी, सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ईमेल खात्यावर न्यायालयाच्या इमारतीवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा संदेश आला. न्यायालय अधीक्षकांनी तात्काळ सातारा शहर पोलिसांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आणि बॉम्ब निकामी पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सर्वप्रथम न्यायालयीन परिसर रिकामा केला. उपस्थित असलेले न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली. मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी अचानक तैनात केल्यामुळे साताऱ्यात घबराट पसरली. न्यायालयासमोर रस्त्यावर लोकांची गर्दी जमली. साताऱ्यानंतर, ठाणे, रत्नागिरी, परभणी, सोलापूर, बीड आणि हिंगोली येथील सत्र न्यायालयांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल प्राप्त झाले. यानंतर, या सर्व भागांतील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. संबंधित न्यायालयीन परिसरात पोलीस दल तैनात करण्यात आले आणि तपास सुरू करण्यात आला. पोलीस ईमेलचा तपास करत असून धमकी पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

