नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि आसपासच्या परिसरात एकापाठोपाठ एक तब्बल चार भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, आज सकाळी ९:५५ वाजता नाशिक परिसरात ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी महाराष्ट्रातील नाशिक आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ होती. या घटनेमुळे काही काळ स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तसेच अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने जमिनीला चार वेळा हादरे बसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आणि सुरक्षिततेसाठी त्यांनी घराबाहेर मोकळ्या जागेत धाव घेतली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने नागरिकांना अजिबात न घाबरता सतर्क राहण्याचे आणि सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Edited By- Dhanashri Naik
