1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Persian cat worth 25,000 stolen from Koregaon Park Pune

कोरेगाव पार्कमधून २५ हजारांचे 'पर्शियन' मांजर चोरीला; दोन वकिलांसह पेट शॉप मालकावर गुन्हा

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील एका बंगल्याबाहेरून २५ हजार रुपये किमतीचे महागडे 'पर्शियन हिमालयन' जातीचे मांजर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या चोरीप्रकरणी दोन वकिलांसह एका पेट शॉप मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या तब्बल तीन महिन्यांनंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
 
काय आहे नेमके प्रकरण?
कोरेगाव पार्कमधील लेन नंबर ३ येथील बंगला क्रमांक ६५ मधून पर्शियन हिमालयन जातीचे मांजर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास घरातून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले. मांजर घरात दिसत नसल्याने राजीव संगतानी यांनी त्यांचे कर्मचारी उमेश भोसले (वय ५५, रा. कॅम्प) यांना याबाबत सांगितले. भोसले यांनी शेजारील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या एका तरुण आणि तरुणीने हे मांजर उचलून कारमध्ये नेल्याचे दिसून आले.
 
सीसीटीव्हीमुळे आरोपींचा सुगावा
सीसीटीव्हीमधील कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी तपास केला असता, ही कार वकील फराह मेमन (रा. बोट क्लब रोड) यांची असून तिच्यासोबत वकील विराज पवार (रा. नाना पेठ) हा तरुण असल्याचे निष्पन्न झाले. ३१ ऑगस्ट रोजी मांजर घरी नेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी (१ सप्टेंबर) मूळ मालकाचा शोध घेण्याऐवजी फराह मेमन आणि तिची आई मुबीना मेमन यांनी कॅम्पमधील एम. जी. रोडवरील 'ॲनिमल प्लॅनेट' या पेट शॉपमध्ये हे मांजर परस्पर ७ हजार रुपयांना विकून टाकले.
 
पेट शॉप मालकालाही केले आरोपी
पेट शॉपचा मालक अमरदीप संदीप अहिवळे (रा. एम. जी. रोड, कॅम्प) याने कोणतीही शहानिशा न करता हे मांजर खरेदी केले आणि पुढे ६ सप्टेंबर रोजी दोन अनोळखी तरुणांना विकले. मात्र त्याने या तरुणांची कोणतीही नोंद किंवा माहिती आपल्याकडे ठेवली नाही. त्यामुळे पोलिसांना अद्याप हे मांजर हस्तगत करता आलेले नाही.
 
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
उमेश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी वकील फराह मेमन, मुबीना मेमन, वकील विराज पवार आणि पेट शॉप मालक अमरदीप अहिवळे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराज डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित जाधव यांनी चिकाटीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला असून पुढील तपास सुरू आहे.
 
टीप : सदर वृत्त हे तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीतील आरोप आणि पोलिसांनी केलेल्या तपासाच्या माहितीवर आधारित आहे.
पुढील लेख
दीप्ती शर्माला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दुसऱ्यांदा 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार मिळाला