दारूप्रेमींना मोठा धक्का! ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंज अन् मॅकडोवेल्सच्या 'या' व्हिस्की-रमच्या विक्रीवर FSSAI कडून बंदी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) भारतातील दारू उत्पादक कंपन्यांवर आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कडक कारवाई केली आहे. देशात अत्यंत लोकप्रिय असलेल्या Old Monk (ओल्ड मॉन्क), McDowell's (मॅकडोवेल्स), Royal Challenge (रॉयल चॅलेंज), Bagpiper (बॅगपायपर) आणि Antiquity Blue (अँटीक्विटी ब्ल्यू) यांसारख्या प्रमुख व्हिस्की व रम ब्रँड्सच्या काही विशिष्ट व्हेरियंट्सच्या (प्रकारांच्या) विक्रीवर FSSAI ने बंदी घातली आहे.
कारवाईमागील मुख्य कारण काय?
कृत्रिम सुगंध आणि फ्लेवर्सचा वापर: FSSAI च्या तपासणीत असे समोर आले की, दारू तयार करणाऱ्या कंपन्या नैसर्गिक प्रक्रियेतून (उदा. मळी, माल्ट किंवा द्राक्षांच्या आंबवण्याद्वारे) व्हिस्की आणि रमची मूळ चव व सुगंध तयार करण्याऐवजी थेट कृत्रिम फ्लेवर्स (Artificial Flavours) मिसळत होत्या. व्हिस्कीमध्ये 'व्हिस्की फ्लेवर' आणि रममध्ये 'रम फ्लेवर' टाकणे हे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन असून यामुळे उत्पादनाचा दर्जा खालावतो (Sub-standard).
ग्राहकांची दिशाभूल: अशा प्रकारे फ्लेवर मिसळून तयार केलेल्या दारूला मूळ 'रम' किंवा 'व्हिस्की' म्हणून विकले जात होते, तर नियमांनुसार अशा उत्पादनांवर "रम-फ्लेवर्ड स्पिरिट" किंवा "व्हिस्की-फ्लेवर्ड स्पिरिट" असे स्पष्ट लिहिणे बंधनकारक आहे.
खोटे दावे: ओल्ड मॉन्कच्या एका व्हेरियंटवर '7 Years Old Blended' असे लिहिण्यात आले होते. परंतु तपासात असे आढळले की, त्यात ९५% पेक्षा जास्त नॅचरल/अनएज्ड स्पिरिट होते आणि मॅच्युअर्ड रम ५% पेक्षाही कमी होती. हा ग्राहकांची फसवणूक करणारा प्रकार मानला गेला आहे.
कोणत्या कंपन्या आणि व्हेरियंट्सवर बंदी आली?
मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर (खोपोली, महाराष्ट्र): ओल्ड मॉन्कचे ३ प्रकार (Old Monk The Legend, Gold Reserve आणि XXX Matured Rum).
युनायटेड स्पिरिट्स / दिएजिओ (Diageo): मॅकडोवेल्स नंबर १ रम (बारामती), अँटीक्विटी ब्ल्यू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की (मध्य प्रदेश युनिट).
इनब्र्यू बेव्हरेजेस (मध्य प्रदेश): बॅगपायपर डिलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रम.
एसोसिएटेड अल्कोहोल (मध्य प्रदेश): सेंट्रल प्रॉव्हिन्स व्हिस्की आणि मॅकडोवेल्स नो. १ सेलिब्रेशन मॅच्युअर्ड XXX रम.
संपूर्ण ब्रँडवर बंदी आहे का?
नाही. FSSAI ने स्पष्ट केले आहे की ही बंदी संपूर्ण ब्रँडवर नसून केवळ विशिष्ट उत्पादन केंद्रांवर तयार होणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या व्हेरियंट्सवर आहे. ज्या कंपन्या सर्व नियमांचे पालन करतात त्यांच्यावर कोणतीही बंदी नाही.