1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. will sugar prices rise again as production projected to fall by 5 percent

साखरेचे भाव पुन्हा वाढणार का? उत्पादनात ५% घट होण्याचा अंदाज; महाराष्ट्र आणि कर्नाटक सर्वाधिक प्रभावित होणार

येत्या २०२६-२७ च्या हंगामात देशातील साखर उत्पादनात सुमारे ५% घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' (ISMA) ने नोव्हेंबर २०२६ मध्ये केलेल्या मूल्यांकनानुसार, देशातील निव्वळ साखर उत्पादन मागील २०२५-२६ हंगामातील २७.९७१ दशलक्ष टनांवरून (२७९.७१ लाख टन) घसरून २६.५२१ दशलक्ष टनांवर येण्याची शक्यता आहे.
 
ISMA च्या अंदाजानुसार, देशातील एकूण ऊस लागवडीखालील क्षेत्र ३.२% नी कमी होऊन ५५.५३ लाख हेक्टर इतके होईल; जे मागील हंगामात ५७.३५ लाख हेक्टर होते. ऊस लागवडीच्या क्षेत्रातील या घटचा परिणाम साखर उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
 
राज्यनिहाय आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील साखर उत्पादन मागील हंगामातील ९९.१७ लाख टन घसरून ८६.८५ लाख टन येण्याचा अंदाज आहे. कर्नाटकात उत्पादन ४.९५४ दशलक्ष टनांवरून कमी होऊन ४६.१९ लाख टन येण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील उत्पादन ८८.९६ लाख टन इतके असेल असा अंदाज आहे—जे मागील हंगामातील ८९.७४ लाख टन तुलनेत किरकोळ घट दर्शवते.
 
तमिळनाडूमध्ये साखर उत्पादन ८.४४ लाख टन आणि गुजरातमध्ये ७.०८ लाख टन इतके राहण्याचा अंदाज आहे. इतर राज्यांमध्ये उत्पादनात वाढ होऊन ते २.७७० दशलक्ष टन पोहोचण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ असा की, साखरेच्या किमतींवर वाढीव दबाव निर्माण होऊ शकतो. जरी सरकारने आपल्याकडे साखरेचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले असले, तरी उसाच्या उत्पादनातील घट नवीन साखरेच्या पुरवठ्यावर परिणाम करेल, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होऊ शकतो.
 
ISMA (इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) च्या अंदाजानुसार, प्रतिकूल हवामानामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात उसाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. अनियमित पाऊस, दीर्घकाळ कोरडे हवामान आणि काही भागांत ऊस जमिनीवर कोसळणे यांसारख्या कारणांमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
ISMA चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी सांगितले की, संस्थेने उपग्रह प्रतिमा, प्रत्यक्ष जमिनीवरील माहिती आणि विविध विश्लेषणात्मक मॉडेल्सच्या आधारे उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन हे कापणीसाठी उपलब्ध असलेले अंतिम क्षेत्र, उसाचे उत्पन्न, पिकाची परिपक्वता, गाळप हंगामाचा कालावधी आणि साखरेचा उतारा यांसारख्या घटकांवर अवलंबून असेल. संस्थेने स्पष्ट केले आहे की, हे केवळ प्राथमिक अंदाज आहेत; पिकांची सद्यस्थिती आणि गाळप हंगामाची प्रगती लक्षात घेऊन, जानेवारी २०२७ मध्ये या उत्पादन अंदाजाचा पुन्हा आढावा घेतला जाईल.
पुढील लेख
भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली