होर्मुझमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेलवाहू जहाजावर हल्ला, जहाजावरील २७ भारतीय सर्व सुरक्षित
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. या दोन्ही जहाजांवर एकूण २९ भारतीय खलाशी होते. सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असून कोणीही जखमी झालेले नाही, ही दिलासादायक बाब आहे, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी सांगितले.
मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ३० ऑक्टोबर रोजी पनामा ध्वजांकित कच्चे तेल वाहून नेणाऱ्या एमटी लुईस १ या टँकरवर क्षेपणास्त्राने हल्ला झाला. जहाजावर सत्तावीस भारतीय खलाशी होते. हल्ला होऊनही, जहाजावरील संपूर्ण कर्मचारी वर्ग सुरक्षित आहे.
सरबानंद सोनोवाल यांनी सांगितले की, एक दिवस आधी, २९ ऑक्टोबर रोजी, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये लायबेरियन ध्वजांकित मोठे कच्चे तेलवाहू जहाज एमटी अर्झाना यालाही लक्ष्य करण्यात आले होते. या जहाजावर दोन भारतीय नागरिक होते. त्यावरही क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला, परंतु दोन्ही भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. अशाप्रकारे, दोन दिवसांत दोन जहाजांवर हल्ले होऊनही, सर्व २९ भारतीय खलाशी सुखरूप राहिले.
केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून
आहे . भारतीय खलाशांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही जहाजांच्या व्यवस्थापन कंपन्यांशी संपर्क साधला जात आहे. या प्रकरणी सरकार संबंधित कंपन्यांशी जवळून समन्वय साधत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

