1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Suspicious death of H B P Daulat Maharaj Satpute

ह. भ. प. दौलत महाराज सातपुते यांचा संशयास्पद मृत्यू, भोकरदनमध्ये मठात गळफास घेतलेला मृतदेह आढळला

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दौलत सातपुते महाराज (महंत देवेंद्र चैतन्य स्वामी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत गावात कीर्तन केल्यानंतर रविवारी (१५ नोव्हेंबर २०२६) सकाळी मठातील त्यांच्या राहत्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
 
मृत कीर्तनकाराचे नाव ह.भ.प. दौलत सातपुते महाराज (वय ४१) असे असून ते महंत देवेंद्र चैतन्य स्वामी म्हणूनही ओळखले जात होते. ते भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिराचे मठपती होते.
 
शनिवारी रात्री सुमारे १० वाजेपर्यंत त्यांनी गावात कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यानंतर ते मठातील आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. रविवारी सकाळी बराच वेळ होऊनही महाराज मंदिरात दर्शनासाठी किंवा खोलीबाहेर न आल्याने गावकऱ्यांना संशय आला. गावकऱ्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता भगव्या रंगाच्या रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
 
पोलीस तपास आणि गूढ
घटनास्थळावरून महाराजांचा मोबाईल फोन गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पारध पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
पुढील लेख
LIVE: शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर ३.०' संदर्भात राजकीय हालचाली तीव्र झाल्या