'कौन बनेगा करोडपती १८' ला पहिला करोडपती मिळाला; जळगाव जिल्ह्यातील रहिवासी भूषण ठाकरे यांनी १ कोटी रुपये जिंकले
अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय क्विझ रिॲलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'च्या १८ व्या पर्वाला अखेर पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय भूषण ठाकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत १ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने प्रसिद्ध केलेल्या शोच्या नवीन प्रोमोमध्ये हा ऐतिहासिक क्षण टिपण्यात आला आहे, जिथे १ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर, मेगास्टार अमिताभ बच्चन स्वतः हॉट सीटवरून उठून भूषणला मिठी मारताना दिसत आहे.
शो दरम्यान, भूषण यांनी त्यांच्या आयुष्यातील त्या दिवसांची आठवण सांगितली, जेव्हा ते एका चांगल्या भविष्याची स्वप्ने घेऊन आणि खिशात फक्त २४ रुपये घेऊन मुंबईत आले होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही, त्यांनी कधीही हार मानली नाही आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर देशाच्या सर्वात मोठ्या मंचावर इतिहास घडवला आहे. हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना भूषण खूप भावूक झाले. त्यांनी सांगितले की, ते गेल्या दीड वर्षापासून जळगावमधील त्यांच्या घरी गेलेले नाहीत. कारण स्पष्ट करताना तो म्हणाला, मी २८ वर्षांचा आहे आणि गेल्या दीड वर्षापासून घरी गेलो नाही. माझ्या आई-वडिलांनी मला खूप कष्टात वाढवले आहे. माझे वडील रोजंदारीवर काम करतात आणि माझ्या आईची तब्येत नेहमीच खराब असते, तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहे. एवढे कष्ट असूनही, माझ्या वडिलांनी आईच्या उपचारांचा खर्च उचलला आणि माझ्या संपूर्ण शिक्षणाचा खर्चही उचलला." भूषणने पुढे स्पष्ट केले की, तो आपल्या आई-वडिलांना त्यांच्या हक्काचे सुख आणि आराम देऊ शकला नाही, याची त्याला नेहमीच खंत वाटत असे. याच कारणामुळे, त्याने आपल्या आई-वडिलांना वचन दिले होते की, आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण आणि महत्त्वपूर्ण मिळवल्यावरच तो घरी परत येईल. भूषण ठाकरे केबीसी १८ चे पहिले करोडपती बनले आहे.

