Meenakshi Amman Temple मीनाक्षी अम्मन मंदिर मदुराई तामिळनाडू
India Tourism : भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्राचीन जागृत मंदिरांपैकी एक म्हणजे मीनाक्षी अम्मन मंदिर होय. हे तामिळनाडूतील मदुराई शहरात असलेले एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिव आणि त्यांच्या पत्नी पार्वती म्हणजेच मीनाक्षी यांना समर्पित आहे.
मीनाक्षी अम्मन मंदिर वैशिष्ट्ये-
मीनाक्षी अम्मन मंदिर वैगई नदीच्या काठावर, मदुराई शहरात आहे. हे शहर तामिळनाडूचे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र मानले जाते. तसेच मंदिर द्रविड स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. यात 14 भव्य गोपुरमआहे, जे रंगीत शिल्पकामांनी सजवलेले आहे. मंदिर परिसरात हजारो खांबांचा सभामंडप आहे, जो शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मीनाक्षी मंदिराच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिराचा गोपूर आहे. सुंदरेश्वर मंदिराच्या चारीही बाजूला गोपूर आहे. त्यावर हिंदू देवदेवतांच्या, पशूपक्ष्यांच्या मूर्ती आहे. प्रत्येक गोपूर नऊ मजली आहे. त्याचे प्रवेशद्वारे वीस मीटर उंच आहे. कुंबथडी मंडपममध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषिमुनींच्या प्रतिमा आहे. जवळजवळ एका कक्षात मीनाक्षी व सुंदरेश्वरजी यांची वाहने आहे. येथेच चांदीत मढवलेला हंस व नंदी देखील आहे. तेथून थोड्या अंतरावर मदुराईचा राजा विश्वनाथ नायक याचा मंत्री आर्य नायक मुठलीच्या काळात बनविलेला सहस्त्रस्तंभ मंडप आहे. यात एकूण 185 स्तंभ आहे. यावरही देवदेवता, नृत्यांगना, योद्धे यांच्या प्रतिमा आहे. तसेच या मंदिराला चार दारे आहे. प्रवेशद्वारावर गणपतीची मोठी प्रतिमा आहे.
पौराणिक कथा-
या मंदिराबाबत एक दंतकथा आहे. मलायाराजा पंड्या निपुत्रिक होता. म्हणून राजा व राणीने एक यज्ञ केला. यावेळी अग्नीतून तीन वर्षीय बालिका प्रकट झाली. ती होमातून बाहेर पडून थेट राणी कंचनमालाकडे गेली. मोठी झाल्यानंतर या राजुकमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला. आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वत:चा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकराची आराधना केली व त्याला पती म्हणून मिळविण्यात ती यशस्वी ठरली. मीनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्करणी नावाचे सरोवर आहे. त्याच्या बाजूला सुंदर हिरवाई आहे. फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरता स्नान घातले जाते.
धार्मिक महत्त्व-
मीनाक्षी म्हणजेच देवी पार्वती आणि सुंदरेश्वर म्हणजेच महादेव यांच्या विवाहाचे स्मरण येथे केले जाते. मंदिरात दरवर्षी मीनाक्षी तिरुकल्याणम हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, जो एप्रिल-मे महिन्यात चिथिराई उत्सवात होतो. या उत्सवात मीनाक्षी आणि सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो.
मंदिराचा इतिहास-
मंदिराचा इतिहास सुमारे 2,500 वर्षांपूर्वीचा आहे, परंतु आजचे स्वरूप 16व्या ते 17व्या शतकात पांड्य आणि नायक राजवंशांनी बांधले. मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे, तलाव आणि प्राचीन शिलालेख आहे. तसेच मीनाक्षी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर तामिळ संस्कृती, कला, आणि परंपरांचे प्रतीक आहे. येथील शिल्पे, चित्रे आणि उत्सव तामिळनाडूच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवतात.
मीनाक्षी अम्मन मंदिर जावे कसे?
विमान मार्ग-मदुराई विमानतळ सुमारे 12 किमी अंतरावर आहे. तसेच विमानतळावरून टॅक्सी किंवा रिक्षा मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते.
रेल्वे मार्ग-मदुराई जंक्शन रेल्वे स्टेशन मंदिरापासून 2-3 किमी अंतरावर आहे.
रस्ता मार्ग-तामिळनाडूतील प्रमुख शहर हे अनेक शहरांना जोडलेले आहे. बस आणि खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते.