पालघरवर सागरी धोका! मालवाहू जहाजावरून कंटेनर पडले, सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुंबईसह किनारपट्टीच्या भागात पाऊस सुरूच आहे. दरम्यान पालघरवर सागरी धोका निर्माण झाला आहे. नौदल, तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिस हाय अलर्टवर आहेत. अरबी समुद्रात एका मालवाहू जहाजातून काही कंटेनर पडले आहेत. ते वाहून जाण्याची शक्यता असल्याचा संदेश उच्च अधिकाऱ्यांकडून मिळाला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पालघर पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'एमव्ही फोनिक्स १५' नावाचे मालवाहू जहाज ओमानमधील सलाह बंदरापासून सुमारे २० नॉटिकल मैल अंतरावर असताना त्याचा तोल गेला. त्यामुळे ४८ कंटेनर जहाजातून पडले. जहाज महासंचालनालयाने माहिती दिली आहे की जहाजातून एकूण ४८ कंटेनर समुद्रात पडले आहेत, त्यापैकी आतापर्यंत ८ कंटेनर बाहेर काढण्यात आले आहेत तर इतर बुडाले आहेत किंवा किनाऱ्याकडे वाहून गेले आहेत अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सागरी आणि खाडी पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
सोमवारी प्रसारित झालेल्या संदेशात, सफाळा, केळवा, सातपाटी, तारापूर, वाणगाव, डहाणू आणि घोलवडसह पालघर जिल्ह्यातील सर्व सागरी आणि खाडी पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालघर पोलिसांनी सांगितले की, केंद्रीय सागरी संस्थांशी समन्वय साधून कोकण किनारपट्टीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
स्थानिक मच्छीमार, किनारी भागातील ग्रामस्थ किंवा गस्ती पथकांना तरंगता कंटेनर किंवा संबंधित साहित्य दिसल्यास त्यांनी त्वरित भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पालघर पोलिसांना कळवावे, असेही या संदेशात निर्देश देण्यात आले आहेत.
पावसासाठी रेड अलर्ट जारी
गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे. जलाशयांची पाण्याची पातळी वाढली आहे. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे समुद्रातही जलद गतीने हालचाल सुरू आहे. हवामान खात्याने मुंबई आणि पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कुर्ला स्थानकांदरम्यानच्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित केल्या. रुळांवर पाणी साचल्याने कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यानच्या मुख्य मार्गावरील सेवाही स्थगित करण्यात आल्या.
मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मिठी नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे रुळांवर सुमारे १२ इंच पाण्याची पातळी बुडाली होती, त्यामुळे सकाळी ११.२० वाजता सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील सेवा स्थगित करण्यात आली.