पोर्श कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह आठ आरोपींचा जामीन फेटाळला
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात आरोप विशाल अग्रवालसह आठ आरोपींचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली विशाल अग्रवाल यांना अटक केले होते. ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीचे व त्याचा मित्राच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते.
या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, अरुणकुमार सिंग, अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल, ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांचा समावेश आहे. या आठ जणांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
न्यायालयात युक्तिवाद करताना सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, रक्तनमुने बदलणे हा गंभीर गुन्हा आहे. आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकून पुरावे नष्ट करू शकतात. असे सरकार तर्फे कामकाज पाहणारे सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले.
या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात दहा आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित केले गेले आहे. आरोपीच्या आईला उच्च न्यायालयाने महिला असल्यामुळे अंतरिम जामीन दिला आहे.
विशाल यांनी आई आजारी असल्याचे कारण देत तात्पुरत्या जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र तो फेटाळून लावण्यात आला. नंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र मुंबई उच्च न्यायालयाने पण आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
Edited By - Priya Dixit