1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Uddhav Thackeray extends direct support to the NEET protest at Jantar Mantar

दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे; "हे राज्यकर्ते पाकिस्तानमधून आलेत का?" – तीव्र संताप

NEET पेपर लीक प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर अभिजित दीपके आणि 'CJP'च्या माध्यमातून तरुणांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. "मी इथे कोणतेही भाषण करायला आलेलो नाही, तर देशाच्या युवाशक्तीच्या जिद्दीला वंदन करायला आलो आहे," अशा शब्दांत त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
 
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, "एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने परिस्थिती बदलणार नाही, तर हे संपूर्ण सरकारच बदलण्याची गरज आहे." खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
 
लाठीचार्जचा तीव्र निषेध: आंदोलक विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध करत उद्धव ठाकरे म्हणाले, "स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच असं सरकार पाहायला मिळत आहे, जे देशाचं भविष्य असलेल्या तरुणांवर लाठीमार करत आहे. विद्यार्थ्यांवर असा हल्ला करणारे हे राज्यकर्ते नक्की पाकिस्तानमधून आले आहेत का?"
 
युवा नेतृत्वाचा अभिमान: महाराष्ट्रातील एक तरुण (अभिजित दीपके) या राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनाचं नेतृत्व करत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र या लढ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
 
आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन: "न्याय मिळेपर्यंत मागे हटायचं नाही. दिल्लीत ठाम राहा आणि हा लढा सुरू ठेवा," असे आवाहन करत ठाकरेंनी पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले.
 
अभिजित दीपके यांनी मानले आभार
आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी विशेष आभार मानताना सांगितले की, "पोलिसांच्या कारवाईनंतर आमचे मनोबल खचले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुंबईहून खास दिल्लीत येऊन पाठिंबा दिल्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांना नवी ताकद मिळाली आहे."
पुढील लेख
महाराष्ट्रात खळबळ: आनंदमठ आश्रमाच्या प्रमुखावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप; पोलिसांकडून गुन्हा दाखल