सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : शनिवार, 10 जानेवारी 2026 (14:24 IST)

मकर संक्रांती २०२६: संपूर्ण माहिती, तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्व

Makar Sankranti 2026 Tilgud Patang Kite मकर संक्रात तिळगूळ पंतग तिळाचे लाडू संक्रात संपूर्ण माहती बोरन्हाण
मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो.
 
तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात, उत्तरायणही याच दिवशी होते हा गैरसमज आहे. पण मकर संक्रांत ही उत्तरायणापेक्षा वेगळी आहे.
 

1. २०२६ मध्ये मकर संक्रांती कधी आहे?

वर्ष २०२६ मध्ये मकर संक्रांती १४ जानेवारी (बुधवार) रोजी साजरी होईल.
संक्रांती : दुपारी ३:१३ वाजता (सूर्य मकर राशीत प्रवेश)
पुण्य काल: दुपारी ३:०६ ते सायंकाळी ५.५० पर्यंत (सुमारे २ तास ३२ मिनिटे)
महापुण्य काल: दुपारी ३:१३ ते ४:५८ पर्यंत (सर्वोत्तम वेळ - स्नान, दान, पूजा साठी)
टीप: यंदा १४ जानेवारीला षटतिला एकादशीही आहे, त्यामुळे दुर्मिळ योग आहे. खिचडी दान १४ तारखेलाच करणे उत्तम मानले जाते (काही ठिकाणी १५ ला करतात).
 

2. मकर संक्रांतीचे महत्व

देवांचा दिवस: धार्मिक मान्यतेनुसार, या दिवसापासून देवांचा दिवस सुरू होतो आणि दैत्यांची रात्र संपते. उत्तरायणाला 'प्रकाशाचा काळ' मानले जाते, जो शुभ कार्यांसाठी उत्तम असतो.
 
नवीन पिकांची पूजा: मकर संक्रांत हा मुळात कापणीचा (Harvest) सण आहे. नवीन आलेल्या धान्याची (जसे की बाजरी, गहू, हरभरा) देवाला नैवेद्य म्हणून पूजा केली जाते. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा होतो.
 
भीष्म पितामहांचा त्याग: महाभारतात भीष्म पितामहाने मृत्यूसाठी उत्तरायणाची वाट पाहिली होती, कारण असे मानले जाते की उत्तरायणात देह त्यागल्यास मोक्ष मिळतो.
 
शनि-सूर्य भेट: पौराणिक कथेनुसार, सूर्यदेव (वडील) आणि शनिदेव (मुलगा) यांचे पटत नसे. मात्र, संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतः आपल्या मुलाच्या (शनिच्या) घरी म्हणजेच मकर राशीत जातात. तिथे ते तिळाने त्यांचे स्वागत करतात. त्यामुळे या दिवशी तीळ वापरल्याने नात्यातील कटुता संपते आणि शनिदोष दूर होतो, अशी श्रद्धा आहे.
 
वाण लुटणे: सुवासिनी महिला धान्य, भांडी किंवा सौभाग्यवतीच्या वस्तूंचे 'वाण' लुटतात. यातून समाजाप्रती कृतज्ञता आणि त्याग व्यक्त केला जातो.

स्नान: गंगा, यमुना किंवा सरस्वती यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
 
दानाचे महत्तव: दानाचा फळ सौपट मिळतो, आत्मशुद्धी आणि पुण्यप्राप्ती होते. या दिवशी जप, तप, दान, स्नान, श्राद्ध, तर्पण आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.
 
गंगा स्नान: मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि गंगेच्या तीरावर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाला तीर्थराज प्रयाग आणि गंगासागर स्नानाला महास्नान असे नाव देण्यात आले आहे. सामान्यतः सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो, परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनातून खूप फलदायी आहे. ही प्रवेश किंवा संक्रमण प्रक्रिया सहा महिन्यांच्या अंतराने होते. भारत देश उत्तर गोलार्धात स्थित आहे. सामान्यतः भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीच्या आधारावर ठरतात, परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या गतीनुसार ठरते.

3. मकर संक्रांतीला तिळगुळाचं महत्त्व

मकर संक्रांतीला तिळगूळ वाटणे ही केवळ एक सामाजिक परंपरा नसून त्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशी तिहेरी कारणे आहेत. "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" या वाक्यातून नात्यांमधील ओलावा जपण्याचा संदेश दिला जातो. याचे सविस्तर महत्त्व खालीलप्रमाणे आहे: 
शास्त्रीय आणि आरोग्यदायी महत्त्व : 
मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात (जानेवारी महिन्यात) येतो, जेव्हा कडाक्याची थंडी असते.
 
उष्णता निर्माण करणे: तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ निसर्गात 'उष्ण' आहेत. त्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आणि उष्णता मिळते.
 
आरोग्य रक्षण: तिळामध्ये लोह, कॅल्शिअम आणि निरोगी फॅट्स असतात, तर गूळ रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेला तिळातील तेलामुळे स्निग्धता मिळते.
 
धार्मिक आणि पौराणिक महत्त्व :
शनि-सूर्य संबंध: पौराणिक कथेनुसार, सूर्यदेव आणि त्यांचा पुत्र शनिदेव यांचे संबंध सुधारण्याचे प्रतीक म्हणजे मकर संक्रांत. जेव्हा सूर्य शनीच्या घरी (मकर राशीत) गेला, तेव्हा शनीने त्यांचे स्वागत काळ्या तिळाने केले होते. त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व अधिक आहे.
 
पापांचा नाश: असे मानले जाते की संक्रांतीच्या दिवशी तिळाचा सहा प्रकारे वापर (स्नान, उटणे, अर्पण, तर्पण, भक्षण आणि दान) केल्याने पापांचा नाश होतो.
 
सामाजिक आणि नैतिक महत्त्व :
कटुता संपवणे: तिळाचा दाणा लहान असतो पण तो गुळात मिसळला की त्याचा गोड लाडू बनतो. त्याचप्रमाणे, "माणसाने जुने हेवेदावे, राग आणि मनातील कटुता विसरून तिळासारखे एकत्र यावे आणि गुळासारखे गोड बोलावे," हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
 
स्निग्धता जपणे: हिवाळ्याच्या कोरड्या हवामानाप्रमाणेच मानवी नात्यातही कोरडेपणा येऊ नये, त्यात 'स्निग्धता' (प्रेम) टिकून राहावी, म्हणून तिळगूळ दिला जातो.
 
तिळगुळाचे विविध प्रकार
महाराष्ट्रात आणि भारतात तिळगूळ वेगवेगळ्या स्वरूपात वापरला जातो:
तिळाचे लाडू: गूळ गरम करून त्यात भाजलेले तीळ आणि शेंगदाणे घालून बनवले जातात.
तिळगुळाची पोळी: गुळाचा वापर करून बनवलेली ही पोळी अतिशय पौष्टिक असते.
हलवा: साखरेच्या पाकात घोळवून बनवलेले पांढरे काटेरी तीळ (मुलांना खूप आवडतात).
अध्यात्मशास्त्रानुसार, तिळामध्ये 'सत्व' लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे तिळगूळ खाल्ल्याने अंतर्शुद्धी होण्यास मदत होते असे मानले जाते.

4. मकर संक्रांतीचे विविध प्रकार

महाराष्ट्रातील 'मकर संक्रांत'
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस चालतो:
भोगी: संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' साजरी करतात. या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण असलेली 'भोगीची भाजी' आणि बाजरीची भाकरी खाल्ली जाते.
संक्रांत: मुख्य दिवशी लोक एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असे म्हणून तिळाचे लाडू किंवा वड्या देतात.
किंक्रांत: संक्रांतीचा पुढचा दिवस, जो देवीने संकरासूर राक्षसाचा वध केल्याचा विजय म्हणून साजरा होतो.
सुवासिनी महिला 'हळदी-कुंकू' समारंभ आयोजित करतात आणि एकमेकींना 'वाण' (वस्तू) लुटतात.

5. मकर संक्राती पूजा विधी (सोप्या पद्धतीने)

सकाळी लवकर उठून स्नान करा (शक्य असल्यास नदीत, नाहीतर घरात).
स्वच्छ कपडे घाला, सूर्यदेवाच्या दिशेने उभे राहून लोट्यात पाणी, फुले, तीळ, लाल फुले घेऊन अर्घ्य द्या.
मंत्र:
ॐ घृणिः सूर्याय नमः (किंवा ॐ आदित्याय नमः) ११/२१/१०८ वेळा जप करा.
तीळ-गूळ, खिचडी, कंबल, उडीद, तांदूळ, हळद, तेल इत्यादी दान करा.
संध्याकाळी सूर्याला नमस्कार करून दिवा लावा.
 

6. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व

मकर संक्रांत हा एकमेव सण असावा ज्यात काळा रंग आवर्जून वापरला जातो. या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे घालून हळदी-कुंकूवाचा समारंभ आयोजित करतात. मकरसंक्रांतपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या दिवशी सुवासिनींना वाण देण्या-घेण्यासाठी बोलावलं जातं. या सणाला काळा रंग घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा. तसं तर सणासुदीला काळा रंग वर्ज्य मानला जातो परंतु मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येत असल्याने या काळात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान करण्याची पद्दत आहे. याशिवाय मकर संक्रातीला लग्न झालेल्या नवीन जोडप्याला तसंच घरातील नवीन बाळाला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात.
 
ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी 'शनि' आहे आणि शनिदेवाचा आवडता रंग काळा आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपल्या मुलाच्या (शनिच्या) घरी जातो, म्हणून शनीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी काळा रंग परिधान केला जातो.
 

7. मकर संक्रांतीला पारंपरिक हलव्याचे दागिने

मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालणे ही महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. हे दागिने प्रामुख्याने नववधू (नव्याने लग्न झालेली स्त्री) आणि लहान मुले (ज्यांचे बोरन्हाण आहे) यांना घातले जातात.
 
हलव्याचे दागिने म्हणजे काय?
हे दागिने खऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसारखेच दिसतात, पण ते बनवण्यासाठी 'हलवा' (साखरेच्या पाकात घोळवलेले काटेरी पांढरे तीळ) वापरला जातो. हे दाणे कापडावर किंवा कागदावर डिंक किंवा सुई-दोऱ्याच्या साह्याने चिकटवून विविध दागिने तयार केले जातात.
 
नववधूचे दागिने
लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नववधूला काळ्या रंगाची साडी (चंद्रकळा) नेसवली जाते आणि त्यावर पांढरेशुभ्र हलव्याचे दागिने घातले जातात. यात या दागिन्यांचा समावेश असतो- 
गळ्यात ठुशी, कोल्हापुरी साज, मंगळसूत्र, हार. 
हातात बांगड्या, बाजूबंद, अंगठी.
कानात झुमके किंवा कुडी.
केसांत वेणी, अंबाडा फूल, मुकुट किंवा बिंदिया. तसेच नथ, कमरपट्टा आणि जोडवी.
 
लहान मुलांचे दागिने
लहान मुलांच्या पहिल्या संक्रांतीला (बोरन्हाण विधीवेळी) त्यांना कृष्णासारखे किंवा परीसारखे नटवून हलव्याचे दागिने घातले जातात:
मुलांसाठी: बासरी, मुकुट, हार, कडे आणि कमरेला साखळी.
मुलींसाठी: छोटे हार, मुकुट, आणि कानातले.
 
या परंपरेचे महत्त्व
तीळ आणि साखर यांचा वापर करून बनवलेले हे दागिने नात्यात गोडवा निर्माण करण्याचे प्रतीक मानले जातात.
काळ्या रंगाच्या कपड्यांवर हे पांढरे दागिने अत्यंत उठून दिसतात.
तसेच नवीन आलेल्या सुनेचे किंवा घरातील लहान बाळाचे लाड आणि कौतुक करण्याचा हा एक मार्ग आहे.
 

8. मकर संक्रांतीला खिचडीचं महत्त्व

मकर संक्रांतीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी सूर्य देव त्यांच्या पुत्र शनीच्या घरी जातात. ज्योतिष शास्त्रामध्ये उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते. अशा स्थितीत या दिवशी उडीद डाळ खिचडी खाऊन दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. तसेच तांदूळ हा चंद्राचा, मीठाचा शुक्र, हळद हा गुरु, हिरव्या भाज्या बुध कारक मानले जातात. त्याच वेळी उष्णतेशी संबध मंगळाशी निगडित आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलीतील सर्व प्रकारच्या ग्रहांची स्थिती सुधारते.
 
आरोग्यासाठी महत्त्व:
हिवाळ्याच्या दिवसात शरीराची पचनशक्ती जपावी लागते. नवीन आलेल्या तांदळाची आणि डाळीची खिचडी पचायला हलकी आणि पौष्टिक असते.
थंडीच्या काळात शरीराला उष्णतेची गरज असते. खिचडीत घातले जाणारे तूप आणि आले-लसूण शरीराला ऊब देतात.
संक्रांतीच्या काळात मटार, गाजर, घेवडा यांसारख्या ताज्या भाज्या येतात, त्या खिचडीच्या माध्यमातून शरीराला मिळतात.
 
खिचडी दानधर्माचे महत्त्व
या दिवशी तांदूळ आणि डाळ (कच्ची खिचडी) गरिबांना दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. याला 'अक्षय दान' म्हणतात, ज्याचे फळ कधीही संपत नाही.
शेतकरी आपल्या नवीन पिकातील काही भाग देवाला आणि समाजाला अर्पण करतो, त्या कृतज्ञतेपोटी खिचडी बनवून वाटली जाते.
 

9. मकर संक्रांतीला पतंग का उडवतात

मकर संक्रांतीला पतंग उडवणे ही केवळ एक मजा नसून त्यामागे आरोग्यदायी, वैज्ञानिक आणि सामाजिक कारणे आहेत. आकाशात झेप घेणारे रंगीबेरंगी पतंग आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतीक मानले जातात.
आरोग्यासाठी महत्त्व: संक्रांतीच्या काळात सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, म्हणजे सूर्याची किरणे पृथ्वीवर प्रखर पडू लागतात. पतंग उडवण्याच्या निमित्ताने लोक तासनतास गच्चीवर किंवा मोकळ्या मैदानात उन्हात थांबतात. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडे आणि आरोग्यासाठी उत्तम असते. सूर्याच्या कोवळ्या उन्हात राहिल्यामुळे हिवाळ्यातील थंडीमुळे जडलेले आजार किंवा शरीरातील जडपणा दूर होण्यास मदत होते.
 
वैज्ञानिक आणि भौगोलिक कारण: या काळात वाऱ्याची दिशा पतंग उडवण्यासाठी अत्यंत अनुकूल असते. उत्तरायणामुळे हवामानात बदल होतात आणि वाहणारा वारा पतंगाला सहज वर नेण्यास मदत करतो.
 
आध्यात्मिक महत्त्व: असे मानले जाते की पतंग हे मानवी आत्म्याचे प्रतीक आहे. पतंग उंचावर नेणे म्हणजे आपला आनंद आणि कृतज्ञता देवापर्यंत पोहोचवणे. पतंग आकाशात उंच जातो, जे प्रगतीचे आणि यशाचे लक्षण आहे. जीवनातील नैराश्य झटकून यशाच्या शिखराकडे जाण्याचा संदेश यातून मिळतो.
 
सामाजिक एकता आणि आनंद: पतंग उडवण्यासाठी मित्रांची किंवा कुटुंबाची साथ लागते (कोणीतरी 'कणा' धरावा लागतो, कोणी 'ढील' द्यावी लागते). यामुळे आपापसातील संवाद वाढतो आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. पतंग उडवताना एकाग्रता आणि संयम लागतो. समोरील व्यक्तीचा पतंग 'काटणे' आणि स्वतःचा पतंग वाचवणे यातून चपळता आणि निर्णयक्षमता वाढते.
 

10. मकर संक्राती विविध नावे

मकर संक्रांती : छत्तीसगड, गोवा, ओडिशा, हरियाणा, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, गुजरात आणि जम्मू
ताड़ पोंगल, उझवर तिरुनल : तमिळनाडू
उत्तरायण : गुजरात, उत्तराखंड
उत्तरैन, माघी संगरांद : जम्मू
शिशूर संक्रांत: काश्मीर खोर्‍यात
माघी : हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब
भोगली बिहू: आसाम
खिचडी : उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहार
पौष संक्रांती: पश्चिम बंगाल
मकर संक्रमण: कर्नाटक
 
भारताबाहेरील विविध नावे
बांगलादेश : शकरैन / पौष संक्रांती
नेपाळ: माघे संक्रांती किंवा 'माघी संक्रांती' 'खिचडी संक्रांती'
थायलंड : सॉन्गकरण
लाओस : पी मा लाओ
म्यानमार: थियान
कंबोडिया: मोहा संगक्रान
श्रीलंका: पोंगल, उझावर तिरुनल
 
पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान पृथ्वीवर अवतार घेतात आणि आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.