1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
  4. Ganpatiche Warache Abhang in Marathi

गणपतीचे वाराचे अभंग

गणपतीचे वाराचे अभंग
 
गणपतीचा रविवारचा अभंग
गणपति शुभमति सद्‌गति दे ॥ध्रु०॥
सिद्धिबुद्धीश्वरा । तूंचि लंबोदरा । मोरया मोरया मोरया ॥
परशु करिं घेउनी, विघ्नवन छेदुनीं वर देउनीं । भाव तव दे ॥१॥
सर्वसंकटहरा । पार्वतीकूमरा । मोरया मोरया मोरया ॥
पूर्ण करि बा दया । वारुनी संन्नया ।
वारिं संसृति भया ।भाव तव दे ॥२॥
रक्तवसनलेपना । रक्तवरभूषणा । मोरया मोरया मोरया ॥
शूर्पकर्णा गणाधीश्वरा धीश्वरा, त्रीश्वरा सर्वदा, दे स्मृति दे ॥३॥
 
गणपतीचा सोमवारचा अभंग
शिवतनया विघ्नराया, लवकर ये धांवुनी । जय मोरया वेदगेया हांक माझी परिसुनी ॥ध्रु०॥
निर्गुण तूं निर्विकार अज अमर तारण । बहिरंतर्व्यापकत्‍वें सर्वांचा कारण ।
असुनि स्वयें तूंचि होसी धर्माचा धारण । सगुणपणें कोण जाणें तव महिमा या जनीं ॥१॥
श्रुति वदती तूं गणाचा गणपती म्हणुनिया । कविकविचा ज्येष्ठराज तूं अससी मोरया ।
ब्रह्माचा ब्रह्मणस्पति गणपति तूं करिं दया । निरवंद्या विश्ववंद्या ये आद्या धांउनी ॥२॥
संकटीं पार्वतीनें स्मरतां तूं सत्वर । येउनीयां स्वीय माया पसरुनियां आसुर ।
पळवुनियां पुत्र होसी तीचा लंबोदर । दरहर तूं विश्वहेतू ये धांवा परिसुनी ॥३॥
 
गणपतीचा मंगळवारचा अभंग
गणाधिनाथा पवित्र गाथा, माथा तव पदिं ठेवूं ।
चतुर्थीचा उत्सव करुनी दूर्वांकुर तुज वाहूं ॥ध्रु०॥
सिंदुर चर्चित मस्तक सिंदुर दनुजारी तूं थोर ।
सर्व संकटें वारुनि विघ्नें, स्मरतां करिसी दूर ॥१॥
विद्यारंभीं उत्सवकालीं जातां येतां नाम ।
मंगलधाम स्मरतां तुझें, मोरया पुरविसि काम ॥२॥
पाशांकुशरद वरद करा तूं अससी जगतीं हेतू ।
स्मरतां भक्तां गति देसी तूं तारक अमुचा तो तूं ॥३॥
लड्‌डुक मोदक भक्षणकारक , शक्तिविधारक एक ।
तो तूं विनायक गजास्य तारक भाविक भयहारक ॥४॥
रक्तच्म्दनप्रसूनवसन प्रिय दूर्वांकुर पूज्य ।
साज्या खाद्याच्या नैवेद्या घेउनि सुख दे प्राज्य ॥५॥
 
गणपतीचा बुधवारचा अभंग
गजवदना सुखसदना शंभुनंदना । विघ्न हरुनि निघ्न करुनिं रमविं मम मना ॥ध्रु०॥
कृतयुगिं तूं पंक्तिहस्त सित विनायक । सिंहवदन, विघ्नदहन, भजक पोषक ।
त्रेतायुगिं मयुरसंगिं मयुरपालक ॥चाल॥ देवा, भावा, भावा ।
जाणसि तूं, षट्‌कर तूं । सद्धेतु । स्वर्णशोभना ॥१॥
द्वापारीं गजवदना, आखुवाहना । रक्तवर्ण, शूर्पकर्ण, परम शोभना ॥
पाशांकुशरदवरकर विघ्नभंजना ॥चाल॥ गणपा । पापा । परिहरिसी ।
वर देसी । भय हरिसी । रक्षिसी जना ॥२॥
कलियुगिं तो तूंच साच येथ प्रगटसी ।
हो उनियां द्विभुज अश्वपृष्ठि बैससी । धूम्रवर्ण तूर्ण भक्तकाम पुरविसी ॥चाल॥
दरदा । वरदा । परदा । विघ्‍नहरा । भक्तवरा । तारिं निज जना ॥३॥
 
गणपतीचा गुरुवारचा अभंग
जयजय गजवदन मदनकोटिसुषमधामन् ॥ध्रु०॥
हिमनगजातनय विनय । हिमकरधर सदयहृदय ।
हतसुररिपुनिचय अभय । वरदशय सुधामन् ॥१॥
चित्त करुनि भक्त विमल । चिंतिति तव पादकमल ।
विघ्न हरुनि त्यांसि सकल । काम देसि भूमन्॥२॥
वक्रतुंड चंडकिरण । चक्रभसुर वरदशरण ।
शक्रमुखध्यातचरण । शरणदाधि महिमन् ॥३॥
जे सर्वारंभि आधिं । आठविती तुज तदाधि ।
वारिसि तूं सुरगणाधिपाधिपा महात्मन् ॥४॥
वासुदेव चित्तरमण । भाविकनिजभक्तशरण ।
करुणाकर पूज्यचरण । विघ्‍नहरण भूमन् ॥५॥
 
गणपतीचा शुक्रवारचा अभंग
देवगणाधीश, आद्य मयूरेश । वंद्य जो विघ्नेश ईशपुत्र ॥१॥
स्मरतां विघ्नवना, जाळीं गजानना । गौरीच्या नंदना, मना चिंतीं ॥२॥
स्मरणें जयाच्या, सर्व संकटाच्या । होळी होते त्यांच्या चिंतीं पदा ॥३॥
आपदा हरुनी, संपदा देऊनी । तारि निशिदीनीं, ध्यानी ध्यात्या ॥४॥
त्याचे कृपादृष्टी सुखी हो हे सृष्टी । त्या ध्याऊं संकटीं पुष्टी दे जो ॥५॥
 
गणपतीचा शनिवारचा अभंग
गणराया ये मोरया । सदया ये देववर्या ॥१॥
तुजवीण कोण तारी । विघ्नभीति हे निवारी ॥२॥
विघ्नकर्ता विघ्नहर्ता । तूंचि एक जगद्भर्ता ॥३॥
तव चरण शरण आतां । विघ्नाची नुरवी वार्ता ॥४॥
धरिले म्यां तव चरण । आतां कैचें ये मरण ॥५॥
पुढील लेख
श्री गणेश प्रताप संपूर्ण अध्याय १ ते २२