1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
  4. Ashadhi Ekadashi 2026 special Farali Thalipeeth Recipe

15 मिनिटांत तयार होणारे फराळी थालीपीठ; आषाढी एकादशीसाठी हेल्दी आणि चविष्ट रेसिपी

नेहमी भगर आणि साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर आषाढी एकादशीसाठी १५ मिनिटांत तयार होणारे फराळी थालीपीठ हा एक उत्तम, पौष्टिक आणि चवदार पर्याय आहे. हे थालीपीठ कमी तेलात बनते आणि पचायलाही हलके असते.
साहित्य-
भगर (वरई) आणि साबुदाण्याचे पीठ: १ वाटी (किंवा बाजारात मिळणारे फराळी पीठ)
उकडलेला बटाटा: १ (मॅश केलेला)
भाजलेल्या दाण्याचा कूट: ३ ते ४ मोठे चमचे
हिरवी मिरची पेस्ट: १ चमचा (चवीनुसार)
जीरे: १ चमचा
शेंदाण मीठ (उपवासाचे मीठ): चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर: आवडीनुसार (उपवासाला चालत असल्यास)
तूप किंवा तेल: थालीपीठ भाजण्यासाठी
 
कृती- 
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात फराळी पीठ, उकडलेला बटाटा, दाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर आणि शेंदाण मीठ एकत्र करा. बटाट्याच्या ओलाव्यामुळे पीठ सहज एकत्र होते; गरज पडल्यास १-२ चमचे पाणी घालून मध्यम घट्ट पीठ मळून घ्या. आता पोलपाटावर किंवा बटर पेपरवर थोडा ओला सुती कपडा पसरवा. पिठाचा एक गोळा घेऊन पाण्याच्या हाताने कपड्यावर गोलाकार थालीपीठ थापून घ्या. मध्ये १-२ छोटे छिद्र करा (ज्यामुळे थालीपीठ छान भाजले जाते). तसेच तवा छान गरम करा. त्यावर थोडे तूप लावा. थापलेले थालीपीठ तव्यावर टाका आणि कपडा हळूच वेगळा करा. छिद्रांमध्ये आणि कडेने थोडे तूप सोडून मंद ते मध्यम आचेवर झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम फराळी थालीपीठ गोड/ताक/दही किंवा उपवासाच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. आषाढी एकादशीच्या उपवासाला हे थालीपीठ खाल्ल्याने दिवसभर पोट भरलेले राहते आणि भरपूर ऊर्जा देखील मिळते!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik