संबंधित माहिती
- ऑनलाइन गेमिंगच्या वादातून मुलाने वडील आणि बहिणीची हत्या केली तर आई गंभीर जखमी
- चोराने डेपोमधून बस चोरली, पण लपवता आली नाही; अनियंत्रण झाल्याने अनेक घरे व दुकानांना धडकली
- वर्तमानपत्रावर समोसे आणि कचोऱ्या दिल्यास तुरुंगवास होणार; एफएसएसएआयने दुकानदारांना कडक इशारा दिला
- सोसाट्याच्या वाऱ्यामुळे IGI विमानतळावर राउंड सपोर्ट उपकरणांची एअर इंडियाच्या तीन विमानांना धडक बसली
- पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार
'मुक्त संवाद' आयोजित १३ व्या बालनाट्य महोत्सवाची शानदार सांगता; १६० हून अधिक बालकलाकारांचे सादरीकरण
इंदूर: "केवळ सर्वगुणसंपन्न आणि सुसंस्कारी शिक्षकच समाजासाठी उत्तम, संवेदनशील आणि प्रगल्भ पिढी घडवू शकतात," असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, नाट्यकर्मी व अभिनेते श्री योगेश सोमण यांनी केले. 'मुक्त संवाद' साहित्य समितीने आयोजित केलेल्या १३ व्या बालनाट्य महोत्सवाच्या सांगता व सत्कार समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
या दिमाखदार सोहळ्यात श्री सोमण यांचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ बालनाट्यकर्मी श्री प्रकाश पारखी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत अविरतपणे मुलांना नाट्यकलेचे धडे देणारे इंदूरचे प्रसिद्ध नाट्यकर्मी श्री श्यामकांत खोडके यांचाही भावपूर्ण सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेले खासदार श्री शंकर लालवानी यांनी मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या 'मुक्त संवाद'च्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
महोत्सवाचे शानदार उद्घाटन सकाळी १०:०० वाजता प्रसिद्ध उद्योजिका श्रीमती हेमलता ताम्हणे आणि श्रीमती अर्चना चितळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
महोत्सवाचा मुख्य उद्देश नाटकांच्या माध्यमातून मुलांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमान निर्माण करणे, त्यांच्यात संघभावना वाढवणे आणि त्यांना आपल्या समृद्ध इतिहास व संस्कृतीशी जोडणे हा होता.
नाटकांतून उलगडले जीवनमूल्यांचे धडे
दिवसभर चाललेल्या या नाट्यमहोत्सवात एकूण १२ नाटकांचे सादरीकरण झाले, ज्यात १६० हून अधिक मुलांनी उत्साहाने भाग घेतला. या नाटकांच्या माध्यमातून केवळ मनोरंजन झाले नाही, तर मुलांवर महत्त्वाचे संस्कार झाले:. काही दिग्दर्शकांनी पौराणिक आणि ऐतिहासिक पात्रांची निवड करून मुलांमध्ये शौर्य, त्याग आणि नैतिक मूल्यांची रुजवण केली. तर बदलत्या काळातील आव्हानांवर बोट ठेवत काही नाटकांनी समाजाला प्रबोधनाचा संदेश दिला.
तर आजच्या काळातील ज्वलंत विषय असलेल्या मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरावर 'चला कैदेतुन सुटूया' आणि 'ए आय सपोर्ट' या नाटकांनी अत्यंत उपरोधिक व प्रभावी शैलीत प्रकाश टाकला. तंत्रज्ञानाचा वापर मर्यादेत कसा करावा, याचे भान यातून मुलांनी प्रेक्षकांना दिले.
समारोप आणि कृतज्ञता सोहळा
सत्कार स्वीकारत ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री प्रकाश पारखी यांनी 'मुक्त संवाद'चे आभार मानले आणि उपस्थित बालकलाकारांशी संवाद साधत बालनाट्याचे बारकावे व रंगभूमीवरील शिस्त समजावून सांगितली. कार्यक्रमाचा शेवट सर्व बालकलाकारांनी एकत्रितपणे 'वंदे मातरम' हे पूर्ण गीत गाऊन केला, ज्यामुळे संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. मुलांमधील आत्मविश्वास आणि एकतेचे दर्शन या क्षणी घडले.
सूत्रसंचालन डॉ. बागेश्री जोशी यांनी आपल्या बहारदार शैलीत केले. तर अतिथी स्वागत श्री निलेश हिरपाठक, श्री अनिल मोडक आणि श्रीमती मंजुषा रेडगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री पंकज नामजोशी यांनी मानले.
मनोरंजनातून मूल्यशिक्षणाचा संस्कार करणारा हा महोत्सव बालरंगभूमीच्या इतिहासात आपला एक वेगळा ठसा उमटवून गेला.