हरवलेल्या चिमण्यांची होणार मोजणी
महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या वतीने १६ ते २६ जानेवारीदरम्यान राज्यभरात महापक्षिगणनेचे आयोजन करण्यात आले आहे. मानवी वस्तीमधील पक्षी, अर्बन बर्ड विशेषकरून चिमणीच्या गणनेवर भर देण्यात येणार आहे. गणनेदरम्यान मोबाइल टॉवर्सचा चिमण्यांवर काय परिणाम होतो याचाही अभ्यास केला जाणार आहे.
प्रचलित सूचीनुसार राज्यात ५४० प्रजातींचे पक्षी नोंदविण्यात आले. इला फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या बर्डस आॅफ महाराष्ट्र अहवालाच्या सूचीमध्ये ५६८ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेची यंदाची गणना जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात होणार आहे. या वर्षी गणना करताना गणना क्षेत्रात २०० मीटर परिसरात मोबाइल टॉवर असेल तर त्याची नोंद करणे आवश्यक असणार आहे. या गणनेचा अहवाल ३१ जानेवारीपूर्वी संघटनेकडे सादर करणे आवश्यक असणार आहे.
